टायटॅनिक बद्दलची, अस्वस्थ करून सोडणारी काही तथ्ये

titanic
टायटॅनिक हे विशालकाय प्रवासी जहाज ‘अन-सिंकेबल’, म्हणजेच कधीही बुडू शकणार नाही अशी ख्याती मिळविलेले होते, मात्र या जहाजाच्या पहिल्याच सफरीदरम्यान अपघात होऊन या जहाजाला जलसमाधी मिळाली. या घटनेवर आधारित किती तरी पुस्तके, लेख प्रसिद्ध झाले. तसेच या घटनेवर आधारित ‘टायटॅनिक’ हा चित्रपट देखील खूप लोकप्रिय झाला. या सर्व पुस्तकांच्या, लेखांच्या, माहितीपटांच्या माध्यमातून या बोटीच्या अपघाताशी निगडित अनेक तथ्ये आपल्यासमोर आली असली, तरी या अपघाताबद्दलची अशी अनेक तथ्ये आहेत, जी आजही फारशी सर्वश्रुत नाहीत.

टायटॅनिक बोटीला होणार असलेल्या अपघाताचे पूर्वानुमान काही वर्षे आधीच लावले गेले होते. एका लेखकाने आपापल्या कादंबरीच्या मार्फत, या अपघाताचे अचूक वर्णन केले होते. १५ एप्रिल १९१२ सालच्या त्या रात्री घडलेल्या अपघाताचे सविस्तर वर्णन या लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये, अपघात घडण्यापूर्वीच अनेक वर्षे करून ठेवले होते. समुद्रमार्गाने सफरीसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी सावधानतेचा इशारा म्हणून हे पुस्तक लिहिले गेले होती, आणि आश्चर्य म्हणजे या पुस्तकामध्ये वर्णन केल्याप्रमाणेच अपघात घडला. ‘द रेक ऑफ टायटन’ असे या पुस्तकचे नाव निव्वळ योगायोग म्हणता येईल का? मॉर्गन रॉबर्टसन नामक या लेखकाने १८९८ साली हे पुस्तक लिहिले होते. म्हणजे टायटॅनिकला अपघात होण्याच्या चौदा वर्षे आधीच हे पुस्तक लिहिले गेले होते !
titanic1
टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्याने त्या बोटीवर प्रवास करणाऱ्या अनेक यात्रेकरूंनी प्राण गमावलेच, पण हे विशालकाय जहाज तयार केले जात असताना देखील अनेक कामगारांनी आपले प्राण गमावले होते. हे जहाज तयार केले जात असताना पडून, किंवा अन्य काही अपघात घडल्याने आठ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच लहान मोठे मिळून तब्बल २४६ अपघात या जहाजाच्या निर्मितीच्या दरम्यान घडले. यांपैकी २८ अपघात गंभीर ठरले होते.
titanic2
टायटॅनिक रात्रीच्या वेळी एका विशालकाय हिमनगाला धडकल्याने तिला अपघात झाला हे तथ्य आपल्या परिचयाचे आहे, मात्र बोटीवर टेहळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा हिमनग मुळातच खूप उशीरा दिसला, हे देखील वास्तव आहे. अपघात घडून आल्याच्या केवळ सदतीस सेकंद आधी हा हिमनग दृष्टीला पडला असल्याने जहाज वळविणे किंवा अन्य मार्गाने अपघात टाळता येणे, किंवा हिमनग समोर असल्याची धोक्याची सूचना वेळेवर पोहोचविणे केवळ अशक्य होते. तसेच बोटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्बीण असून, त्यांनी त्याचा वापर आधीच केला असता, तर कोण जाणे, कदाचित हा अपघात घडला ही नसता, असे ही म्हटले जाते.
titanic3
टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्यानंतर पुढच्या दिवशी निरनिराळ्या वृत्तपत्रांनी निरनिराळी तथ्ये प्रसिद्ध केली. अमेरिकन वृत्तपत्रांनी, या अपघातामध्ये अनेक यात्रेकरू मरण पावल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. वास्तविक सुमारे पंधराशे यात्रेकरूंनी आपले प्राण या अपघातामध्ये गमाविले असूनही ब्रिटीश वृत्तपत्रांनी मात्र, या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त सुरुवातीला प्रसिद्ध केले होते. तसेच जिथे ही बोट बुडाली, तिथे अनेक वर्षांनी तिचे अवशेषही सापडले, पण वैज्ञानिकांच्या मते, समुद्राच्या पाण्यामध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवाणूंच्या प्रभावामुळे हे अवशेष हळू हळू नष्ट होत आहेत. किंबहुना आणखी वीस वर्षांनी टायटॅनिकचे अवशेष समुद्रातून संपूर्णपणे नाहीसे होतील असा वैज्ञानिकांचा कयास आहे.

टायटॅनिक हिमनगाला टकराविण्याआधी काही काळ, ‘एस एस कॅलिफोर्निया’ या बोटीवरून, पुढे हिमनग असण्याची शक्यता असल्याची धोक्याची सूचना टायटॅनिकला देण्यात आली होती. पण टायटॅनिकवरील कर्मचाऱ्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय टायटॅनिक इतके बळकट जहाज जगामध्ये अस्तित्वात नसून, ते कधीही बुडणार नाही अश्या पद्धतीने बनविले गेल्याचा संदेश उत्तरादाखल पाठविला होता.

Leave a Comment