मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार; फिरवला चौकशीचा आदेशच


मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका अभियंत्याच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या फाईलमधील मजकूर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते. त्या संबंधित फाईलवर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहीदेखील केली होती. पण, या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर परस्पर बदलण्यात आला. वरच्या भागात मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर स्वाक्षरीच्या लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांची परवानगी कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी महत्त्व असते. पण, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरा बदलण्याचे धाडस मंत्रालयातच कुणीतरी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात युतीचे सरकार असताना सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याच्या कारणावरून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आलेल्या फाईलमधील अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते.

सत्तेत महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशीची ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईल परत आल्या. मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला असताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करण्याचा आदेश देण्यात आल्याचे पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनी अन्य अभियंत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला होता. पण, त्यामधून नाना पवार यांचे नाव वगळले होते.

हा शेरा मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत कसाबसा लिहिला होता. मुख्यमंत्री एरवी सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे ही फाईल चव्हाण यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पुन्हा पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या प्रतींची तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहला नसल्याचे उघड झाले. नाना पवार यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे निष्पन्न झाले.