टीम इंडियाच्या ‘गब्बर’वर ‘या’ फोटोंमुळे होऊ शकते कारवाई


नवी दिल्ली – सोशल मीडियावर भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन खूपच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांबरोबर तो अनेक गोष्टी शेअर करत असतो. पण शिखर धवन आता यामुळेच अडचणीत सापडला आहे. शिखर धवन वाराणसीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे अडचणीत सापडला आहे. शनिवारी आपल्या इन्स्टाग्रामवर शिखर धवनने काही फोटो पोस्ट केले आहेत.

बर्ड फ्लूचे देशभरातील विविध शहरामध्ये सावट आहे. बर्ड फ्लूचे संकट असताना पक्ष्यांना हाताळणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाने केलेल्या असतानाच शिखर धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्यामुळे त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे. इन्स्टाग्रामवर शिखर धवन याने फोटो पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले. स्थानिक प्रशासनाने व्हायरल झालेल्या फोटोनंतर या प्रकरणाची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, शिखर धवन याच्यावर कारवाईची शक्यता होऊ शकते. यावर प्रशासन गंभीर विचार करत आहे.


याबाबत माहिती देताना वाराणसी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले की, नावेतून विहारासाठी शिखर धवन गेला होता. त्याने त्यावेळी काही पक्षांना खाऊ घातले. बर्ड फ्लूचे गंभीर संकट सध्या आपल्यासमोर उभे असल्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून शिखर धवनने फोटो पोस्ट केला आहे. तो यामध्ये पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. या फोटोची आता चौकशी केली जात आहे. शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई सुरु केली जाणार आहे. भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन सध्या वाराणसीत मुक्कामी आहे. यावेळी त्यानं बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. तसंच गंगा आरतीही केली.