हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधणे? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व? – राम कदम


मुंबई : शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी भाग घेणाऱ्या रामभक्तांना भिकारी संबोधले. शिवसेनेचे हे कसले हिंदुत्व असल्याचा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, रामभक्तांचा अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे अपमान झाला असल्यामुळे सर्व रामभक्तांची शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली.

राम मंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि राम भक्ताची मनापासून इच्छा आहे की, निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असे असताना देखील, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधणे? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व?,” असा सवाल राम कदम यांनी ट्विटरवरून विचारला आहे. तसेच, राम भक्तांना भिकारी संबोधनारे अब्दुल सत्तार यांनी इतरांना भिकारी म्हणण्यापूर्वी याचे उत्तर द्यावे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.


दरम्यान, भाजपकडून अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यावरून धुळ्यातील एका कार्यक्रमात भाजपवर निशाणा साधला होते. राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून भाजपचे नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपला टोला लगावला आहे.