…तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – उदय सामंत


पुणे: कोरोनाची भीती जोपर्यंत सगळ्यांच्या मनातून जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. महाविद्यालये कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सगळ्यांकडून विचारला जात आहे. यासंदर्भातील निर्णय विद्यापीठांशी चर्चा करुन लवकरच घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

पुण्यात ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी यावेळी तुर्तास तरी महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील, हे स्पष्ट केले. महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

एखाद्या घटकाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही, महाविकास आघाडीची हीच भूमिका आहे. ओबीसी समाजाची भूमिका विजय वडेट्टीवार हे सातत्याने मांडत आहेत. पण, त्यावरुन मंत्रिमंडळात कोणताही वाद नसल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाविकास आघाडी प्रत्यक्ष सहभागी झालेली नाही. तरीही आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. आज पुण्यातील काही शेतकऱ्यांची मी भेट घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

काँग्रससोबत येण्यास शिवसेनेने उशीर केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदुत्व दाखवले, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. उदय सामंत यांना त्यावर विचारणा करण्यात आली. तेव्हा उदय सामंत यांनी म्हटले की, सुशीलकुमार शिंदे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या विधानावर मी बोलणे योग्य नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.