उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला आमदार शिवेंद्रराजे भोसले बारामतीत


पुणे – आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण ही भेट राजकीय नसल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी भेट घेतली. येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बंद खोलीत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बंद खोलीत दोघांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश नव्हता.

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी त्यांची भेट घेतली होती. ते आता थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला नाही. सदर चर्चेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विकासकामासंबंधी चर्चेसाठी पवार यांच्या भेटीला आल्याचे सांगितले. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.