‘या’ वेळेत करु नका कोणत्याही युपीआय अॅपचा वापर, NPCI ने दिली महत्त्वाची माहिती


नवी दिल्ली – डिजिटल व्यवहारांवर केंद्र सरकारने जोर दिल्यापासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे नागरिकांकडून व्यवहार वाढले आहेत. पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या अनेक UPI अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तुम्हीही जर ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

पुढील काही दिवस युपीआय पेमेंटमध्ये समस्या जाणवू शकते अशी महत्त्वाची माहिती युजर्सना नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिली आहे. युपीआय पेमेंटच्या सेवेमध्ये रात्री १ ते ३ वाजेदरम्यान समस्या जाणवू शकते. ही समस्या पुढील काही दिवस जाणवेल. त्यानुसार युपीआय व्यवहारांचे ग्राहकांनी नियोजन करावे असे NPCI ने सांगितले आहे. यादरम्यान सिस्टिम अपग्रेडचे काम केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. NPCI ने ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने ही समस्या किती दिवस जाणवेल हे मात्र सांगितलेले नाही. दरम्यान नव्या वर्षापासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. पण त्यात कोणतेही तथ्य नसून चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण NPCI ने दिले होते.