ईडीची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर कारवाई


वसईः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) सकाळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर कारवाई केली आहे. ईडीने ही कारवाई कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी केली आहे. वसई-विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील प्रवीण राऊत हे आरोपी आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे प्रवीण राऊत यांच्याशी आर्थिक संबंध असून, या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. ५ ते ६ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग पीएमसी घोटाळ्यात झाले असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले.

ईडीने वसई-विरारसह मीरा भाईंदर परिसरात धाडी टाकल्या असून यात काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही विवा ग्रुपशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती सुरूच असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीनंतर पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज वर्षा राऊत यांनी परत केले आहे होते.

एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रवीण राऊत हे माजी संचालक आहेत. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांनी ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील ५५ लाख पुढे वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.