गुजरात सरकारकडून ड्रॅगन फ्रूटचे नामकरण


अहमदाबाद – देशात सध्या शहरांसोबतच रस्त्यांचे नामकरण करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील काही शहरांची नाव बदलून टाकली. तर सध्या महाराष्ट्रातही औरंगाबादचे नामकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. पण, भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थेट फळाचे नामकरण केले आहे. रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचे नामकरण केले असून, ड्रॅगन फ्रूट आता यापुढे गुजरातमध्ये कमलम (कमळ) या नावाने ओळखले जाणार आहे.

गुजरातमध्ये देशात आणि जगभरात ड्रॅगन फ्रूट नावाने प्रसिद्ध असलेले फळ कमलम म्हणून ओळखले जाणार आहे. ड्रॅगन शब्द फळाला वापरणे चांगले नाही. कमळासारखे ड्रॅगन हे फळ दिसत असल्यामुळे या फळाला नाव संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.

आता गुजरातमध्ये चिनी ड्रॅगन फ्रूट कमलम नावाने ओळखलं जाणार आहे. गुजरातमधील कच्छ आणि नवसारी या भागात शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. या भागात मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, गुजरातच्या वन विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलण्यासाठीही याचिका केलेली आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ कमळासारखे दिसते आणि शेतकरीही या फळाला कमळ फळ म्हणून ओळखू लागले असल्यामुळे या फळाला कमळ नाव देण्याची मागणी राज्य सरकारकडून कण्यात आलेली आहे.

कृषी संशोधन परिषदेकडे विनंती केलेली असतानाच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नावाची घोषणा केली. ड्रॅगन हा शब्द कोणत्याही फळाला वापरणे योग्य नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या फळाचे नाव कमलम करण्यात आले आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या या फळाचे नवे नामकरण गुजरात पुरतेच मर्यादित असणार आहे. योगायोग म्हणजे भाजपच्या प्रदेश मुख्यालय असलेल्या कार्यालयाचे नावही कमलमच आहे.