दारु पिऊन कोरोनाची लस घेतल्यामुळे डॉक्टरची तब्येत बिघडली


देहरादून : शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस सरकारी दून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के के टम्टा यांना देण्यात आला होता. त्यानंतर रविवारी तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टरांची तब्येत बिघडल्याचे कळल्यानंतर लस घेणाऱ्या इतर लाभार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. पण यावर आता रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.

कोरोना लस घेतल्यामुळे डॉक्टर टम्टा यांना त्रास झालेला नाही तर ‘इलेक्ट्रोलाईट असंतुलन’ झाल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. लसीकरण होण्याआधीच्या सायंकाळी डॉ. टम्टा यांनी मद्य प्राशन केले होते. दारुचे अंश आणि त्यातच लस घेतल्यानंतर डॉक्टरांच्या शरीरात इलेक्ट्रोलाईट असंतुलित झाले आणि ते आजारी पडल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. कोरोना लसीचा हा दुष्परिणाम नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष सयाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, टम्टा यांचे अनेक रक्त चाचण्या तसेच स्कॅन करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना टम्टा यांच्या आरोग्याची माहिती दिली असून लवकरच टम्टा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असेही सयाना यांनी म्हटले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. टम्टा यांचे नाव कोरोना लस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यादीत नव्हते. पण लसीची एक अतिरिक्त बाटली उपलब्ध असल्यामुळे टम्टा यांनाही लस देण्यात आली होती. लसीच्या प्रत्येक बाटलीत ५ मिलीलीटर लस असते. बाटली एकदा उघडल्यानंतर ही लस १० जणांच्या लसीकरणासाठी पुरते. काही बाटल्यांमध्ये ५.०५ मिली लस बाकी असल्याचे आम्हाला आढळल्यामुळे टम्टा यांचेही शनिवारी त्याच अतिरिक्त लसीतून लसीकरण करण्यात आले. १०० जणांचे लसीकरण एका दिवशी करण्याचे लक्ष्य होते. पण यादीतील केवळ ४६ लोकच लसीकरणासाठी उपलब्ध होते. शनिवारी १०० पैंकी ७६ जणांना सरकारी दून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात लस देण्यात आली.

कोरोना लस ज्या व्यक्तींना देण्यात आली, त्यांच्यात हलक्या तापासारखी लक्षणे दिसून येऊ शकतात. यासंबंधी लोकांमध्ये जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सोमवारी लस घेण्यासाठी आलेल्या लोकांनी ताप, खोकला आणि सर्दी असल्याचा दावा केल्यानंतर त्यांना लस देण्यात आली नसल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे. राज्यभरात ३४ केंद्रांवर सुरु असलेल्या लस मोहिमेंतर्गत सोमवारी ३४०० जणांचे लसीकरण होणार होते. परंतु, केवळ १९६१ व्यक्तींचे लसीकरण पार पडले.