भारतीय संघाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक


मुंबई – भारतीय संघाने प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि अनेक खेळाडूंना दुखापतीने ग्रासलेले असताना ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे भारताने ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची विजयाची परंपरा गुंडाळत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देखील या विजयावर अभिमान व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियावर भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत मिळविलेल्या जोरदार विजयासह मालिका जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात गाबाच्या मैदानावर मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघाने दुर्दम्य आशावाद आणि जिद्द यांच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली. भारतीय संघाने या मालिकेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना नवीन विक्रम प्रस्थापित केला, ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.