आता यापुढे सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक


मुंबई : यापुढे आता सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले असून कायद्याच्या कलम144 मधील तरतुदीनुसार मुंबई पोलिसांनी शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापना यांना सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य केले आहे. सीसीटीव्हीच्या नजरेत या खासगी संस्था, आस्थापनांच्या बाहेरील सर्व परिसर हा आला पाहिजे, त्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

दिवसागणिक गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे गुन्हेगारीला आणि चोरीला आळा घालण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मायानगरी दृष्टीने शासनाकडून शहरात सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पण मुंबईच्या गल्ली बोळात आणि लहान रस्त्यावर याचा फायदा होत नसल्यामुळेच शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापनांनी सीसीटीव्ही बसवल्यास अधिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक प्रकारांना सीसीटीव्हीमुळे आळा बसू शकेल. तर काही खासगी सोसायट्या, संस्था, आस्थापना अथवा प्रतिष्ठानांमध्ये त्यांच्या खासगी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले आहेत. पण या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या कंपाऊंडमधील परिसर नजरेखाली राहतो. पण या आस्थापनांच्या बाहेरील परिसर निगराणीखाली येत नसल्यामुळे हा परिसर कव्हर करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार शहरातील खासगी आस्थापनांमध्ये एक लाखांहून अधिक सीसीटीव्ही बसवले जाण्याची शक्यता आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गुणवत्ता आणि रेकॉर्डींग क्षमता खराब नाही, याकडेही लक्ष देण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.