ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. ४ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. यात विविध खेळाडूंचे योगदान दिसून आले. पण या यशाचा कळस ऋषभ पंत याने चढवला. बेजबाबदार फटके खेळणारा ऋषभ पंत अशी अवहेलना होणाऱ्या ऋषभ पंतने आज भारतीय संघाला विजयश्री मिळवून दिला आणि विशेष म्हणजे नाबाद राहून विजयी फटका खेळण्याचा बहुमान मिळवला.
धमाकेदार खेळी करत ऋषभ पंतने बंद केले टीकाकारांचे तोंड
ऋषभ पंतने १३८ चेंडूत ९ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ८९ धावा चोपल्या. अतिशय दमदार खेळ करणारा ऋषऊ पंत हा खेळाडू असला तरी त्याच्याकडे संयम नाही अशी टीका त्याच्यावर अनेकदा केली जात होती. पण तो आजच्या सामन्यात नाबाद राहिला आणि संघाला विजय मिळवून देईपर्यंत खेळपट्टीवर तग धरून राहिला. त्याच्या या खेळीमुळे त्याने टीकाकारांची तोंडं बंद केली.
या सामन्यात ऋषभ पंतने एक विक्रम केला असून सर्वात कमी वेळेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त बळी मिळवण्यात हातभार लावण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम त्याच्या नावे होताच. ११ कसोटी आणि २२ डावांमध्ये त्याने हा पराक्रम केला होता. त्यानंतर आज त्याने आणखी एक विक्रम केला. सर्वात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठणारा भारतीय यष्टीरक्षक ठरण्याचा बहुमान त्याने मिळवला. १६ कसोटी आणि २७ डावांमध्ये त्याने हि किमया साधली.