उद्यापासून राज्यभरात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन


मुंबई – एका महिलेकडून सामाजिक न्याय यासारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर झालेले आरोप पाहता धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते. पण राजीनामा घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी साधी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त न केल्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उद्यापासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिला.

यासंदर्भात भाजप महिला मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची सामाजिक न्याय सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने कबुली दिली आहे. आपण पहिल्या पत्नीच्या संमतीनेच सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार आहे. मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.

एकीकडे शक्तीसारखा कायदा स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी केला जात आहे. पण दुसरीकडे महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांविरोधात केली जात आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये, याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगत मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील, असेही खापरे यांनी या पत्रकात स्पष्ट केले.