राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळले लसीकरण स्थगितीचे वृत्त


मुंबई – शनिवारपासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पण राज्यात दोन दिवसांसाठी लसीकरण अभियान स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण लस नोंदणीसाठीचे ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावले आहे.

कोरोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला. पण राज्यात पहिल्याच दिवशी को-विन अॅपमध्ये तांत्रिक दोष झाल्याचे समोर आल्यामुळे राज्यात १७ व १८ जानेवारीला होणारे लसीकरण स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते.

राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरण स्थगित करण्यात आल्याचे वृत्त फेटाळले आहे. १८ जानेवारीपर्यंत राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

शुक्रवार रात्रीपासून कोरोना लसीकरणासाठी केंद्राने उपलब्ध केलेले ‘को-विन’ अ‍ॅप चालत नसल्यामुळे पालिकेच्या यंत्रणांचा मुंबईत गोंधळ उडाला होता. शुक्रवारी रात्रीपर्यंत लाभार्थ्यांची यादी तयार झाली तरी को-विन अ‍ॅप मधून संदेश पाठविले जात नसल्यामुळे शेवटी रुग्णालयांच्या जवळच्या भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलवावे लागले. शनिवारी सकाळीदेखील काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी येण्याचे फोन आल्याचे प्रकार घडले.