महाराष्ट्रातील कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही – अनिल देशमुख


मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. अनेकांनी संबंधित महिलेविरोधात ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. यानंतर महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करुन घेत नसल्याची तक्रार केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री असल्याचे म्हणत सूचक विधान केले आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी अनिल देशमुख यांनी संवाद साधला. आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत पीडित महिला असून पोलीस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्यासंबंधी प्रश्न अनिल देशमुख यांना विचारण्यात आला असता, त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचे पोलीस खाते योग्यप्रकारे चौकशी करुन, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. जे काही तपासात समोर येईल, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.