धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्माने घेतला युटर्न


मुंबई – राज्यातील राजकीय वातावरण राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपानंतर चांगलेच ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मुंडे यांचे मंत्रीपद त्यामुळे जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात दिसत होते. पण आता मुंडे यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण बलात्कार प्रकरणात रेणू शर्माने युटर्न घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रेणू यांनी स्पष्टीकरण करत म्हटले आहे की, हे सर्व प्रकरण धनंजय मुंडे यांनी जाणीवपूर्वक केले असून, कोणत्याही हनी ट्रॅपचा मी भाग नसल्याचे स्पष्टीकरण रेणू यांनी दिले आहे.

दरम्यान, रेणू शर्मा यांच्यावर भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी देखील हनी ट्रॅपचा आरोप केला असून, रेणूवर मनसे नेते मनिष धुरी यांनी देखील आरोप केला आहे की, रेणू त्यांच्याशी 2010 पासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे मुंडे यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या अधिक मजबूत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सदरील महिला माझी बदनामी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनीही दिले होते.

दरम्यान, त्यांच्यावर आरोप करणारे याआधी का पुढे आले नाहीत, असा सवाल रेणू शर्माने केला आहे. त्याचबरोबर त्या म्हणाल्या की, आता जरी मी मागे हटले तरी मला माझा अभिमान असेल. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढते आहे. रेणू शर्माने ट्विटरवरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक ट्विट करत त्यांची बाजू मांडली आहे.