इंडोनेशियाला भूकंपाचे झटके : रुग्णालयाची इमारत कोसळली


जकार्ता – शुक्रवारी इंडोनेशियाला भूकंपाचे मोठे धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती. एका मोठ्या रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत कोसळली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रुग्णालय कोसळल्याची माहिती बचाव कार्याच्या कामात असलेल्या पथकातील अरिंतो या व्यक्तीने दिल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. मामुजू शहरामध्ये ही दूर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अरिंतोने म्हटले आहे. पण नक्की किती रुग्ण आणि कर्मचारी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती देण्यात आलेली नाही.

जमीनीखाली १० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणाऱ्या सुलावेसी शहराला सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदतकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाचा पहिला मोठा धक्का रात्री एक वाजण्याच्या सुमारास जाणवला. या दरम्यान ६० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. हा भूकंपाचा झटका सात सेकंदांसाठी जाणवला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. पण समुद्रकिनाऱ्यावर सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. इंडोनेशियातील काही ठिकाणी गुरुवारीही भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे झटके जाणवले होते. या भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये लोक आपल्या घरातून बाहेर पळत येताना दिसत आहेत. रस्त्यांच्या आजूबाजूला मोडून पडलेल्या घरांचे ढिगारे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.