शनिवारपासून सुरू होत असलेल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर


नवी दिल्ली – शनिवारपासून देशात बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होत असून या मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारने तत्पूर्वी राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख या नियमावलीत करण्यात आला आहे. सर्वात आधी लशीचा लाभ कोरोनायोद्धय़ांना मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२९३४ केंद्रांवर आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण एका केंद्रावर करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून यामध्ये १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही, तसेच स्तनपान करणाऱ्या मातांचे लसीकरण करु नये, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

लसीची अदलाबदल केली जाऊ नये, असे केंद्र सरकारने यावेळी स्पष्ट सांगितले आहे. ज्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता त्याच लसीचा डोस दुसऱ्या वेळी दिला जावा असे केंद्राने नमूद केले आहे. औषध नियामकाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत. कोरोनाची लागण ज्यांना झाली होती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांचे, प्लाझ्मा थेरपी झालेल्यांचे तसेच इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्यांचे लसीकरण चार ते आठ आठवड्यांसाठी स्थगित करावे लागणार आहे.

शनिवारपासून देशात सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी आरोग्य मंत्रालयाने सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.