धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेने मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला – भाजपा नेते


मुंबई – रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. लवकरच पोलिसांकडून या प्रकरणात चौकशी करण्यात येईल. दरम्यान आता भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

रेणू शर्मा मला २०१० सालापासून त्रास देत होती. ती वेगवेगळया फोन नंबरवरुन माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. तिला मी प्रत्येकवेळी टाळत होतो. माझ्या मागे रेणू शर्मा लागली होती. माझ्यासोबत तिला संबंध प्रस्थापित करायते होते. मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न ती करत असल्याचा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तेव्हा, मी माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढली. तेव्हा, रेणू शर्मा फसवणूक करते, हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवत असल्याची मला माहिती मिळाली, असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले. चार ते पाच वर्ष तिने माझा पाठलाग केला. तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी तिला पैसे हवे होते. म्हणून ती मागे लागली होती. तिचा अखेरचा मेसेज सहा जानेवारीला २०२१ ला आला. तुम्ही मला विसरलात का? असे तिने म्हटले असल्याचे कृष्णा हेगडे म्हणाले.

त्यानंतर धनंजय मुंडे यांचे प्रकरण काही दिवसातच समोर आले. त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी मी आज पुढे आल्याचे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.