आता Snapchat ने कायमस्वरुपी ‘बॅन’ केले डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट


वॉशिंग्टन – सोशल मीडिया कंपन्या अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सतत बंदी घालत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांना Snapchat नेही कायमस्वरुपी बॅन करत असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्यावर यापूर्वी कंपनीने अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. सोशल मीडिया कंपन्या कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर ट्रम्प यांना बॅन करत आहेत.

लोकांच्या हिताची काळजी घेत आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली असल्याचे स्नॅपचॅटच्या प्रवक्त्याने सांगितले. चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण त्यांच्या अकाउंटवरुन पोस्ट होत होते. आमच्या धोरणाविरोधात हे असल्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही एकाच दिवसापूर्वी ट्रम्प यांच्या अकाउंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली. यूट्यूबने ही कारवाई ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत केल्याचे म्हटले. याशिवाय ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनीही उचलले आहे. तर, ट्रम्प यांचे खाते ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही बंद केले आहे.