अखेर वुहानमध्ये दाखल झाली WHO ची विशेष टीम


वुहान – जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोनाची उत्पत्ती कशी झाली? हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे. तज्ज्ञांची टीम जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणाऱ्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी वुहानमध्ये पोहोचली आहे.

दहा शास्त्रज्ञांच्या या टीमला कामास सुरुवात करण्याआधी दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. कोरोनाची उत्पत्ती कशा झाली? हे अद्याप समोर आलेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते या विषाणूने प्राण्यांमधून मानवी शरीरात प्रवेश केल्याचे म्हटले आहे, तर काहींच्या मते हे मानवनिर्मिती संकट आहे. त्यासाठी वुहानमधील प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जाते. चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर हा संसर्गजन्य आजार जगभरात वेगाने फोफावला. आधीच या व्हायरसचे मूळ शोधण्याला बराच विलंब झाला आहे.

चीनमध्ये WHO ची टीम दाखल झालेली असताना, तिथे कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. उत्तर चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनावर चीनने बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते. पण तिथे पुन्हा रुग्ण संख्या वाढत असून एका प्रांतामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.