मुंबईत दाखल झाला कोरोना प्रतिबंधक लसींचा पहिला साठा


मुंबई – लवकरच देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असून सीरम इन्स्टियूटकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसींचा मंगळवारी पुरवठा करण्यात आला.कोरोना प्रतिबंधक लस पुण्यातून देशभरात रवाना झाली. मुंबईमध्ये लसींचा पहिला साठा बुधवारी सकाळी ५.३० वाजता दाखल झाला आहे. १ लाख ३९ हजार ५०० कुप्या मुंबईत पोहोचल्या आहेत.

ही लस पुण्याहून मुंबईत महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने आणण्यात आली. हा साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात पोहोचला असून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या १६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

लसीचा हा पहिला साठा पुण्याहून महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. लस साठा वाहनाचे एफ/दक्षिण विभाग कार्यालयात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.

कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत लस साठवून ठेवण्यासाठी कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या एक कोटी लस साठवून ठेवण्याची क्षमता कोल्डस्टोरेजमध्ये आहे. मात्र याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. दुरुस्तीकामे पूर्ण न झाल्याने आरोग्य विभागाने परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात आता लसींचा साठा करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. आतापर्यंत एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर झालेली आहे.

मुंबईमधील लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार असल्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

सुरुवातीला आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. प्रतिदिन १२ हजार जणांना या आठ केंद्रांमध्ये कोरोनाची लस देण्याचे नियोजन होते. त्यानंतर पालिका रुग्णालये, सलग्न रुग्णालये, दवाखाने, जम्बो कोरोना केंद्र आदी ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. त्या दृष्टीने आखणी सुरू केली असून या केंद्रांमध्ये प्रतिदिन ५० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा पार केला आहे. उपलब्ध होणारी लस कमी काळात अधिकाधिक व्यक्तींना देण्याचा मानस असून त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.