राज्य निवडणूक आयोगाचा ‘जनाग्रह’ पुरस्काराने सन्मान


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगास ‘जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी एका ऑनलाईन समारंभात या पुरस्काराचा स्वीकार केला.

बंगळुरू येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशिप अँड डेमोक्रसी या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. नागरिकांचे जीवनमान आणि शहरांचा दर्जा उंचावणे, हा या संस्थेचा उद्देश आहे. उत्कृष्ट राज्य, महानगरपालिका, नागरी संस्था, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग अशा पाच गटांत राष्ट्रीय स्तरावर हे पुरस्कार देण्यात येतात. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, राजकीय- प्रशासकीय विषयातील तज्ज्ञ आदी आठ मान्यवरांच्या समितीने पुरस्कारार्थींची निवड केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ आणि अतुलनीय कामगिरी केलेले व्ही. रामचंद्रन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पुस्कार दिले जातात.

राज्य निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था असून आयोगावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी आहे. मतदार आणि उमेदवारांच्या लक्षणीय संख्यमुळे या निवडणुका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि चुरशीच्या होतात, हे एक आव्हान असते. ते पेलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन, हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभागली जाते. पारंपरिक पद्धतीने या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आणि वेळेची आवश्यकता असते. संगणकीय प्रणालीमुळे मनुष्यबळ आणि वेळेची बचत होते. शिवाय निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यात मदत झाली आहे. त्यासाठी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आपल्या संपूर्ण राज्याचा गौरव आहे, अशी प्रतिक्रिया यु.पी.एस. मदान यांनी व्यक्त केली आहे.