ज्या मुस्लिमांना भारतीय वैज्ञानिकांवर विश्वास नाही, त्यांनी थेट पाकिस्तान जावे; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – मुस्लिम समुदायाकडून कोरोना लसीसंदर्भात व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाच्या पार्श्वभूमीवर एका भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना, भारतीय वैज्ञानिकांवर ज्या मुस्लिमांना विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात जावे, असे मेरठमधील सरधानाचे भाजप आमदार संगीत सोम यांनी म्हटले आहे.

कोरोना लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी असून काही मुस्लिम लोकांचा देशावर भरवसा नसून देशातील वैज्ञानिक, पोलीस आणि पंतप्रधानांवर विश्वास ठेवायला ते तयार नाहीत. पाकिस्तानच त्यांना जवळचा वाटत आहे, तर त्यांनी पाकिस्तानातच जावे. पण भारतीय वैज्ञानिकांवर अविश्वास दाखवू नये, सोम म्हणाले. अशावेळी संगीत सोम यांचे हे वक्तव्य आले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने ज्यावेळी देशवासियांना कोरोना लस घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी नुकतेच पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांसाठी लस मोफत देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, कोरोना प्रतिबंध लस ही डुकराची चरबीयुक्त लस असल्याचे सांगत जगभरातील मुस्लिमांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विविध लस निर्मिती कंपन्यांनी त्यावर म्हटले होते की, आमच्या लसीमध्ये आम्ही कोणत्याही प्रतिबंधीत गोष्टीचा वापर आम्ही करत नाही. पण, वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, लसीला स्थिर ठेवण्यासाठी त्यात डुक्कराच्या चरबीचा वापर करणं गरजेचे बनते. त्यामुळे मुस्लिम समुदायाने लसींवर शंका व्यक्त केली आहे.