डिसेंबरमध्ये घेतली कोरोनाची लस आणि जानेवारीत निघाला बाधित


लंडन – आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरची कोरोना लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार लंडनमध्ये समोर आला आहे. या आरोग्य कर्मचाऱ्याचे डेविड लॉन्गडन असे नाव आहे. साऊथ वेल्स येथील ब्रिजेंडीमधील प्रिंसेज ऑफ वेल्स रुग्णालयामध्ये डेविड कार्यरत आहे. याबाबत डेविडने दिलेल्या माहितीनुसार आठ डिसेंबर रोजी फायझरच्या लसीचा पहिला डोस त्याने घेतला होता. पण आपल्याला लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याची डेविडने म्हटले आहे. डेविडचे कोरोना रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले असून डॉक्टरही यामुळे गोंधळात पडले आहेत.

फायझरच्या लसीचा दुसरा डोस डेविडला पाच जानेवारी रोजी देणे अपेक्षित होते. पण ऐनवेळी नियमांमध्ये सरकारने बदल केला. कोरोना पहिली लस देशातील जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. डेविडला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डेविडला कोरोना कसा झाला याचा तपास डॉक्टर सध्या करत आहेत. डेविडला लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण कशी झाली या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्याचे आव्हानात्मक काम डॉक्टरांच्या टीमसमोर आहे.

लसीचा पहिला डोस मी घेतल्यानंतरही कोरोनाची लागण सरकारी कारभारामुळे झाली यावरुन सरकारला पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची किती चिंता आहे हे दिसून येत असल्याचे सांगत डेविडने आपली नाराजी व्यक्त केली आहे. डेली मेलला डेविडने दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून तो आपातकालीन विभागामध्ये काम करत होता. रोज अनेक कोरोना रुग्णांना या विभागामध्ये दाखल करण्यात येत आहे. ज्या ब्रिजेंडीमधील रुग्णालयात डेविड काम करतो, तो प्रदेश कोरोनाची सर्वाधिक लागण झालेल्या प्रदेशांपैकी एक आहे.

माझ्या कुटुंबाची मला चिंता वाटत असल्याचेही डेली मेलशी बोलताना डेविडने म्हटले आहे. कुटुंबातील कोणाला माझ्यामुळे कोरोनाची लागण तर झाली नसेल ना अशी भीती आपल्याला वाटत असल्याचे डेविड सांगतो. मधुमेहाचा त्रास माझ्या पार्टनरला असल्याने कोरोनाची लागण तिला झाल्यास जास्त त्रास सहन करावा लागू शकतो, असेही डेविड म्हणाला. मला लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणार नाही असा विश्वास होता. त्यामुळे मी लस घेण्यापूर्वी ज्या पद्धतीची खबरदारी घ्यायचो,ती सुद्धा फार घेत नव्हतो अशी कबुलीही डेविडने दिली.

सध्या डेविडची प्रकृती स्थिर असून डेविडला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मला डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास असल्याचेही डेविडने स्पष्ट केले आहे. मला तीन दिवसांपासून थकवा जाणवत असल्याने कोरोना चाचणी करण्याचा मी निर्णय घेतला आणि चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डेविडने दिली.