खडकवासल्यातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा – दत्तात्रय भरणे


मुंबई : खडकवासला (जि. पुणे) येथील रस्त्यांची कामे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन काळात प्रभावित झाली. आता ही कामे 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. कामे सुरु असताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणे, पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविणे आदी उपाययोजनांद्वारे सुरक्षितरित्या वाहतुकीचे नियमन करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

‘खडकवासला येथील रस्त्यांची कामे सुरु असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करणे’ या अनुषंगाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, उपसचिव (रस्ते) बी. एस. पांढरे, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणेचे अधीक्षक अभियंता अ.भी. चव्हाण, सहायक अभियंता व्ही. एस. भुजबळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हायब्रिड ॲन्युईटीअंतर्गत सुरू असलेल्या मावळ तालुक्यातील पौड-कोळवण-लोणावळा रस्ता सुधारणा, शिळींब मोरवे घुसळखांब ते राज्य महामार्ग-210 ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे तसेच वेल्हे तालुक्यातील खडकवासला-डोणजे-खानापूर- रांजणे पाबे ते राज्य महामार्ग-106 रस्त्याची सुधारणा करणे या कामांच्या प्रगतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

या प्रकल्पातील रस्त्यांची कामे सुरु असताना प्रारंभी झाडे तोडण्यासाठी परवानगी, वीजेच्या खांबांचे स्थलांतर आदी बाबतच्या अडचणी होत्या. तसेच रस्त्याची काही लांबी वनहद्दीत असल्याने वनविभागाची परवानगी तसेच नंतरच्या काळात कोविड परिस्थितीमुळे जवळपास 6 महिने काम थांबले होते. विकासकामातील अडथळे दूर करुन कामाला गती देण्यात आली असून नांदेड सिटी ते पाबे (ता. वेल्हे) या लांबीतील सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आता उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे तसेच कामादरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही याबाबतच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दत्तात्रय भरणे यांनी संबंधितांना दिले.