व्हायरल; पोलिसाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यासाठी राम कदमांचा फोन


मुंबई – सध्या सोशल मीडियावर भाजप आमदार राम कदम यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका करण्यासाठी फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या या संभाषणात आरोपींची सुटका करण्यास राम कदम सांगत आहेत. आरोपींनी पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना मारहाण केली होती.

या आरोपींची सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी नावे असून दुचाकीवरुन ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. त्याचबरोबर एका वाहनालाही त्यांनी धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पण आरोपींकडून यानंतरही कायद्याचे उल्लंघन केले जात होते. रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसेच मारहाण केली.

राम कदम यांनी यानंतर पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचे मी समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचे अजून लग्नही झालेले नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटले असते. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा, असे राम कदम सांगत असल्याचे ऐकू येत आहे.

त्यांची सुटका करा सांगणे योग्य नाही असे सांगत यामुळे त्यांचे करिअर संपेल असे राम कदम यांनी यावेळी म्हटले. दुसरीकडे मी आमदार म्हणून तुमचा आदर करतो, पण जर त्यांची सुटका केली तर महाराष्ट्र पोलिसांना मारहाण करण्याची हिंमत त्यांच्यात येईल, असे उत्तर कॉन्स्टेबलने राम कदम यांना दिले.

एका पोलीस कर्मचाऱ्याला तिघांनीही मारहाण केली आहे. माझ्याजागी तुम्ही असता तर काय केले असतं? माझ्यासोबत त्यांनी गैरवर्तन केले असून माझाही आत्मसन्मान असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल बोलताना ऐकू येत आहे. त्याने यावेळी आपण तुमची मदत करु शकत नसल्याचे राम कदम यांना सांगितले. आरोपी घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. याशिवाय ते भाजपच्या आयटी सेल आणि इतर विभागांमध्येही काम करतात.