आनंद महिंद्रांनाही आवरता आला नाही Signal अ‍ॅप डाउनलोड करण्याचा मोह


नवी दिल्ली – नवीन वर्षात इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीविरोधात वापरकर्त्यांची नाराजी दिवसेंदिवस वाढत असून व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीला जगभरातून होत असलेला विरोध सिग्नल अ‍ॅपच्या मात्र चांगलाच पथ्यावर पडला आहे. आता महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही सिग्नल अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे आवाहन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी केल्यानंतर भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही भारतीयांना सिग्नल अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन केले होते आणि त्यानंतर आता आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे सिग्नल अ‍ॅप डाउनलोड केल्याची माहिती दिली आहे.

ट्विटरद्वारे सिग्नल डाउनलोड केल्याची माहिती आनंद महिंद्रांनी शेअर केल्यापासून त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रायव्हसीबाबत चिंता वाटत असेल तर सोशल मीडियाचा वापरच करु नका, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर, सिग्नल अ‍ॅपचे समर्थन करत महिंद्रांनी उचललेले पाऊल योग्य असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अनेकांनी तुम्ही डाउनलोड केलेले अ‍ॅप आम्हीही निश्चिंत होऊन डाउनलोड करु शकतो, असे म्हटले आहे.

दरम्यान, सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली असून अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्येही आता सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. सिग्नल अ‍ॅप अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती दिली. यासोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला असून कॅप्शनमध्ये ‘बघा तुम्ही काय केले?, अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्याचबरोबर भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरले आहे.

तुमचा पर्सनल डेटा सिग्नल अ‍ॅपद्ववारे मागितला जात नाही किंवा स्टोअरही केला जात नसल्यामुळे हा डेटा कोणासोबत शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त तुमचा फोन नंबर सिग्नलवर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचे फिचरही यामध्ये असून सिग्नलची खासियत म्हणजे यात ‘डेटा लिंक्ड टू यू’ (Data Linked to You) फिचरही देण्यात आले आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित असते.