नवी प्रायव्हेट पॉलिसी फक्त बिजनेस अकाऊंटसाठी; व्हॉट्सअॅपने दिले स्पष्टीकरण


नवी दिल्ली – इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅप वर नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे जगभरातून टीका होत असतानाच आता आपल्या नवीन पॉलिसीबाबत कंपनीने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्यामुळे मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे, असा दावाही कंपनीने केला आहे.

आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत तुमचे खासगी मेसेज सुरक्षित ठेवले जातील. व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिले आहे. याबाबत कंपनीने दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस अकाऊंटसाठी असल्याचा दावा कंपनीने पहिल्यांदा स्पष्टीकरण देतानाही केला होता.


ट्विटसोबतच आपल्या ब्लॉगची एक लिंकही व्हॉट्सअॅपने शेअर केली आहे. पॉलिसीमध्ये झालेला बदल केवळ बिजनेस अकाऊंटसाठी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचा कोणताही परिणाम खासगी चॅटिंगवर होणार नाही. फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअऱ केली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअॅपच्या स्पष्टीकरणातील मुद्दे

  • तुमचे खासगी मेसेज व्हॉट्सअॅप वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय याची परवानगी फेसबुकलाही दिलेली नाही.
  • तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री व्हॉट्सअॅप सेव्ह करत नाही.
  • तुम्ही शेअर केलेली लोकेशन व्हॉट्सअॅप बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
  • तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट व्हॉट्सअॅप फेसबुकसोबत शेअर करत नाही.
  • व्हॉट्सअॅप ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.
  • तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात.
  • तुम्ही तुमचा व्हॉट्सअॅप डेटा डाउनलोड करु शकतात.