जातप्रमाणपत्रे देण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी दोन महिला अधिकारी कार्यमुक्त


मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असताना बार्टी पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी या समितीच्या कार्यालयात धडक देऊन वांद्रे येथील जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा भोंगळ कारभार उघडकीस आणला. दोन महिला अधिकाऱ्यांना गजभिये यांनी या दिरंगाईबद्दल तत्काळ कार्यमुक्त केले आहे.

हा प्रकार गुरुवारी वांद्रे येथील कार्यालयात घडला. गजभिये यांनी समितीच्या संशोधन अधिकारी व सदस्य सचिव सुनिता मते आणि समितीच्या उपायुक्त व नियंत्रक अधिकारी सलिमा तडवी या दोघींना कार्यमुक्त केले. या कार्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्रे देताना कार्यालयीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जात नाही आणि गैरप्रकार होत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचा ठपका गजभिये यांनी कार्यमुक्तीच्या आदेशातच ठेवला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात लवकर या कार्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, पालक आणि विद्यार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्यामुळे त्यांचे प्रवेश धोक्यात आल्याच्या तक्रारी थेट करण्यात आल्या होत्या. गजभिये त्याची दखल घेत स्वत:च गुरुवारी या कार्यालयात गेले. सुनीता मते या कार्यालयात हजर नव्हत्या. या समितीचे कामकाज अतिशय अनियमित स्वरुपाचे असल्यामुळे समितीच्या कामकाजाची चौकशी केली जाईल, असे गजभिये यांनी गमे यांच्या कार्यमुक्ती आदेशात म्हटले आहे.

मुंबई शहर समितीच्या संशोधन अधिकारी व सदस्य सचिव ममता शेरे यांच्याकडे मते यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर मुंबई शहराचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त व सदस्य उमेश सोनवणे यांच्याकडे सलिमा तडवी यांचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.