जेवणानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन कितपत योग्य?


मर्यादित प्रमाणामध्ये घेतलेले कॅफिन हे शरीरासाठी वरदान ठरू शकते. तसेच कॅफिनच्या प्रमाणासोबतच हे कॅफिन कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराला मिळत आहे हे पाहणे देखील महत्वाचे असते. त्या दृष्टीने ग्रीन टी चे सेवन अतिशय लाभकारक मानले जाते. अनेकदा, भोजन झाल्यानंतर त्वरित ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला कितपत योग्य आहे याचा विचार अवश्य करायला हवा.

ग्रीन टी ला ‘वंडर ड्रिंक’ म्हटले गेले आहे. मात्र भोजन करताना किंवा भोजन झाल्यानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन अयोग्य ठरू शकते. ग्रीन टी मध्ये ‘फेनॉल्स’ नामक रसायने असतात. आपण घेत असलेल्या आहारामधील लोह या फेनॉल्समुळे शरीरामध्ये अवशोषित होऊ शकत नाही. तसेच आपण घेत असलेल्या भोजनामध्ये जर दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट असतील, म्हणजेच दुधापासून तयार केलेले पदार्थ आपण भोजनामध्ये खाणार असू, तर त्यावेळीही ग्रीन टीचे सेवन अपायकारक ठरू शकते. याचे कारण असे, की दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये असणारी प्रथिने ग्रीन टी मधील तत्वांना पुष्कळ अंशी निकामी करतात. त्यामुळे ज्या व्यक्ती शरीराची चयापचय शक्ती वाढविण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी ग्रीनटीचे सेवन करतात, त्यांच्यासाठी ग्रीन टी निरुपयोगी ठरू शकतो.

जर ग्रीन टी भोजनासोबतच किंवा भोजनानंतर लगेचच घेण्याची सवय असेल, तर आपल्या आहारामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असेल याची खबरदारी घ्यावी. मात्र ज्यांच्या शरीरामध्ये लोहाची आधीपासूनच कमतरता आहे, त्यांनी ग्रीन टी भोजनासोबत किंवा भोजनानंतर घेणे टाळणे चांगले. अश्या व्यक्तींनी ग्रीनटी चे सेवन दोन जेवणांच्या मधल्या वेळेमध्ये करणे चांगले. असे केल्याने आहारातील पोषक तत्वे शरीराला मिळून, ग्रीनटी मधील पोषक तत्वे ही शरीराला मिळू शकतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment