भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू


भंडारा – महाराष्ट्रासाठी शनिवारची पहाट दुर्दैवी ठरली असून काळाने सगळे मध्यरात्री निद्रिस्त असताना डाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दहा नवजात बालकांचा या अग्नितांडवात मृत्यू झाला. ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

शॉर्ट सर्किटमुळे भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली. ही घटना शनिवारी रात्री अचानक घडली. रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे आले. दार उघडून नर्सने बघितले असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. लागलीच ही माहिती नर्सने रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

अग्रिशामक दलाने माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

या दूर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली आहे.