डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टिवटिव’ ट्विटरने केली कायमची बंद


वॉशिंग्टन – ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत प्रचंड गोंधळ घातला. ट्रम्प समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर दोन दिवसांपूर्वी औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. संसदेत शिरत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड हिंसाचार घडवून आणला.

ट्रम्प यांचे काही ट्विट्स या घटनेनंतर ट्विटरने डिलीट केले होते. त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरूपात अकाऊंटही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण ट्विटरने त्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही कालावधीत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर त्यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असून, ही कारवाई करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांची या अकाऊंटवरून सुरू असलेली टिवटिव ट्विटरच्या या कारवाईमुळे कायमची थांबली आहे. ट्रम्प हे अकाऊंट या कारवाईमुळे सुरू करू शकणार नाहीत.