भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला


सिडनी – भारतीय फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतरही केलेल्या हराकिरीमुळे पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पहिल्या डावाच्या अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा रविंद्र जाडेजाने प्रयत्न केला. नाबाद २८ धावांची खेळी जाडेजाने केली. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाने भरातीय फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे वर्चस्व मिळवले आहे. अफलातून क्षेत्ररक्षणाचे ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रदर्शन केले. भारताच्या तीन फलंदाजांना कांगारुंनी धावबाद केले. यामध्ये हनुमा विहारी(४), आर. अश्विन (१०)आणि जसप्रीत बुमराह (००) यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक चार बळी घेतले आहेत. तर हेजलवूडने दोन भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. तर स्टार्कला एक विकेट मिळाली.

कर्णधार अजिंक्य रहाणे तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर कमिन्सच्या सुरेख चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. संघाचा डाव सावरण्याचा पंत-पुजारा यांनी प्रयत्न केला. पण हेजलवूडने नव्या चेंडूवर पंतला बाद करत ही जोडी फोडल्यानंतर पुजाराही लगेच बाद झाला. त्यामुळे एकवेळ चांगल्या स्थितीत असणाऱ्या भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ऑस्ट्रेलियानं सामन्यावर पकड मिळवली.