मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर सोनू सूद; रहिवासी इमारतीत अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका


मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आता मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर अभिनेता सोनू सूद आहे. कारण सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. जुहूमधील सहा मजली रहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय सोनू सूदने अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. सोनू सूदविरोधात एमआरटीपी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करावी, असे जुहू पोलिसांना महापालिकेने सांगितले आहे.

चार जानेवारी रोजी जुहू पोलिसात महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती सागर इमारत या रहिवासी इमारतीत हॉटेल सुरु केले आहे. सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचा आणि वापरात बदल केल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान सोनू सूदनेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आपण इमारतमधील बदलासाठी महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) मंजुरीसाठी थांबले असल्याचे सोनू सूदने म्हटले आहे.

सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊदरम्यान गरिबांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी अपार मेहनत घेतली होती. तो गरिबांसाठी जणू देवदूतच ठरला होता. परंतु तेव्हा मदतीसाठी चर्चेत असणाऱ्या सोनूची यावेळी मात्र चुकीच्या कारणांमुळे चर्चा आहे.