सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे झाला ट्रान्सवुमन


आपली ओळख नेमकी काय, ती मिळविण्यासाठी तिला थोड वेळ लागला. पण, जेव्हा त्याची अनुभूती झाली तेव्हा मात्र तिने आपल्या जीवनालाच कलाटणी देणारा एक निर्णय घेतला. हा निर्णय समाजाच्या दृष्टीने तेवढाच धाडसी ठरला, तर तो कलावविश्व आणि इतर अनेकांसाठी स्वागतार्हही ठरला. ट्रान्सवुमन होण्याचा तो निर्णय़ होता आणि तो बॉलिवूडमधील सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे याने घेतला आहे. आता ज्याची नवी ओळख ‘साईशा’ अशी असणार आहे.

दीपिका पदुकोण, किआरा अडवाणी, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ यांच्यासह इतरही अनेक सेलिब्रिटींसोबत काम करण्याचा अनुभव असणारा स्वप्नील शिंदे यापुढे ट्रान्सवुमन असणार आहे. आताच्या साईशाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जीवनातील या महत्त्वाच्या बदलाची माहिती सर्वांसमोर आणली. त्याचबरोबर आपल्या नावाचा अतिशय समर्पक अर्थही सर्वांपुढे मांडला. साईशा म्हणजेच अर्थपूर्ण आयुष्य….


तुमच्या बालपणीच्या काही आठवणी जागवणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात. हे सारे म्हणजे माझ्यासाठी एकाकीपणा, एक प्रकारचे दडपण आणि मनातील कोलाहलाने प्रत्येक क्षणाला होणारा माझा झालेला गोंधळ एवढेच, असं या पोस्टच्या सुरुवातीलाच म्हटले आहे. शाळा आणि महाविद्यालातील मुले ज्यावेळी आपल्याला वेगळे म्हणून हिणवायचे तेव्हा होणाऱ्या यातना या शब्दांपलीकडच्या होत्या असे न चुकता पोस्टमध्ये नमूद करण्यात आले. आपले स्वत:चे हे जगणे नसल्याचे माहिती असतानाही या समाजाच्या अपेक्षा आणि अटींपोटी आपण जगत होतो. पण, ऐन तारुण्यावस्थेतच हे सत्य मी स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने माझे आयुष्य बहरल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

साईशा होण्यापर्यंतचा स्वप्नील यांचा प्रवास येथेच थाबंला नव्हता. जीवनातील काही वर्षे आपण गे असल्याचे समजत तो पुरुषांकडे आकर्षित झाला. पण, सहा वर्षांपूर्वीच ही बाब त्याने स्वीकारली की, आपण गे पुरुष नसून एक ट्रान्सवुमन आहोत. हा बदल इतका सकारात्मक पद्धतीने स्वीकारला गेला की, शिंदे यांना आता त्यांचा स्टाफही ‘मॅम’ म्हणून संबोधत आहे, ते देखील अतिशय अभिमानाने. आपल्या जीवनातील या अतिशय मोठ्या बदलाची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली, तेव्हा सेलिब्रिटींपासून ते कला विश्वातील अनेक मित्रमंडळींकडून त्यांच्यावर या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा आणि या निर्णयासाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. अदिती राव हैदरी, सई ताम्हणकर, परिणीती चोप्रा, सनी लिओनी यांनी साईशा शिंदेचे या वर्तुळात मोठ्या आपलेपणाने स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.