तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश नाकारल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख चीनवर नाराज


नवी दिल्ली – चीनवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अद्यापही कोरोना व्हायसरसाठी कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला चीनने प्रवेश नाकारल्यामुळे टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टेड्रोस जिन्हिवा येथून ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान येथे सापडल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम याची चाचपणी करण्यासाठी चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. अद्यापही त्या अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यासाठी गरज असणाऱ्या सर्व परवानग्या चीनमधील अधिकाऱ्यांनी घेतल्या नसल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे.

टेड्रोस यांनी पुढे बोलताना सांगितलं की, चीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी असून हे मिशन जागतिक आरोग्य संघटनेची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. ही टीम प्राण्यांच्या आजारावरील तज्ज्ञ पीटर यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. चीनममध्ये प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी जुलै महिन्यात पीटर गेले होते.

दुसरीकडे कोरोनाची नेमकी कुठून आणि कशी सुरुवात झाली याची माहिती चीन गोळा करत आहे. वेगवेगळ्या अभ्यासातून कोरोनाचा प्रसार होणारी ठिकाणे वेगवेगळी असल्याचं समोर येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. कोरोनाला योग्य प्रकारे हाताळले नसल्याचा चीनवर वारंवार आरोप होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील चीनवर जाहीरपणे कोरोनाचा फैलाव केल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलेल्या अमेरिकेने पारदर्शकपणे संपूर्ण तपास व्हावा अशी मागणी केली आहे.