उत्तर प्रदेश सरकारच्या लसीकरणासंदर्भातील तयारीची पोलखोल


लखनौ – कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपातकालीन वापरास परवानगी मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आगामी दहा दिवसांत देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केल्यामुळे लसीकरण मोहीम पुढील आठवडय़ात सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने मागील काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लसीकरण सराव फेरी म्हणजेच ड्राय रन घेतली. तसेच आरोग्य मंत्रालयाने ही ड्राय रन यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. कोणत्याही अडचणी लसीकरणादरम्यान येऊ नयेत आणि त्यामध्ये असणारे दोष दूर करता यावेत यासाठी ड्राय रन घेण्यात आल्या होत्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीचा फज्जा उडल्याचे पहायला मिळाले.

आरोग्य कर्मचारी वाराणसीमधील ड्राय रनदरम्यान चक्क सायकलवरुन कोरोनाची लस घेऊन रुग्णालयात दाखल झाला आणि अनेकजण गोंधळात पडले. रुग्णालयामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले. पण रुग्णालयापर्यंत लस कशी पोहचवली जाईल, यासंदर्भातील प्रशासनाची कोणतीही तयारी ड्राय रनमध्ये दिसून आली नाही.

चक्क सायकलवरुन वाराणसीमधील चौकाघाट कोरोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात लस पोहचवण्यात आली. विशेष म्हणजे ही लस रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथेही कोणतीच तयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. केंद्रापर्यंत कोरोनाची लस पोहचवताना ती योग्य तापमानात राहील, केंद्रापर्यंत ती कशी पोहचलवी जावी यासाठी काय खबरदारी घ्यावी, याचा सराव या ड्राय रनमधून होणे अपेक्षित होते. पण त्या उलट चक्क सायकलवरुन लस केंद्रावर पोहचवण्यात आल्याने उत्तर प्रदेश सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाराणसीचे मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. व्ही. बी. सिंह यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी लस पोहचवण्यात सायकलवरुन आल्याचे मान्य केले. तर व्हॅनने पाच केंद्रांवर लस पोहचवण्यात आली. केवळ महिला रुग्णालयामध्ये सायकल कॅरिअरच्या माध्यमातून लस पोहचवण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. लसीकरणासंदर्भातील ड्राय रनचे नियोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी करण्यात आले आहे.

ड्राय दरम्यान कोणालाही प्रत्यक्षात लस दिली जात नसून लस केंद्रापर्यंत कशी पोहचले, ती आरोग्य केंद्रात कशापद्धतीने ठेवली जाईल यासंदर्भातील तपासणी आणि तयारी कुठपर्यंत आली याची चाचणी ड्राय रनच्या माध्यमातून केली जात आहे. असे असतानाही लसीकरणासंदर्भातील उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वतयारीचा फज्जा उडल्याचे चित्र दिसत आहे, यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

कोरोना लसीच्या ड्राय रनसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्देश दिलेले असतानाही यासाठीचे योग्य नियोजन न झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक केंद्रांवर स्वयंसेवकच उपस्थित नव्हते. काही ठिकाणी २५ लोकांच्या लसीकरणाचा सराव करण्याचे ठरवण्यात आले होते, तिथे केवळ दोनजण लस टोचून घेण्यासाठी पोहचल्याचे चित्र दिसले. उत्तर प्रदेशमध्ये ५ जानेवारी रोजी सर्वात मोठी ड्राय रन घेण्यात आली. लखनऊमधील लोहिया संस्थानमध्ये ड्राय रनची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ हे पोहचले होते.