पाकिस्तानचा पराभव करत आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड अव्वलस्थानी


ख्राईस्टचर्च – न्यूझीलंडने पाकिस्तान संघाचा कसोटी मालिकेत २-० ने दारुण पराभव करत आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड ११८ गुणांसह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. न्यूझीलंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहचले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर ११६ तर तिसऱ्या क्रमांकावर अससेल्या भारतीय संघाच्या नावावर ११४ गुणांची नोंद आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचा डाव आणि १७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

२९७ धावांपर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने पहिल्या डावांत मजल मारली होती. न्यूझीलंडने या आवाहनाचा पाठलाग करताना केन विल्यमसनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर ६५९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरदाखल पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावांत १८६ धावांवर आटोपला.

न्यूझीलंडने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात विल्यमसनच्या २३८ धावांच्या खेळीच्या बळावर ६ बाद ६५९ धावांचा डोंगर उभारला होता. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेने याआधी श्रीलंकेच्या विरोधात ६२१ धावां चोपल्या होत्या. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका वगळता फक्त भारतीय संघाने ६०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.

न्यूझीलंडचा संघ मागील १७ सामन्यापासून घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. न्यूझीलंडने आज लागोपाठ सहावा विजय मिळवला आहे. तर तिसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. न्यूझीलंडला २०१७ मध्ये घरच्या मैदानावर पराभवचा धक्का बसला होता. मागील १७ कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने १३ सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामने अनिर्णीत राहिले आहे.