इस्रोच्या संशोधकाचा धक्कादायक दावा; मला ठार मारण्यासाठी चटणीमधून केला विषप्रयोग


नवी दिल्ली – मागील तीन वर्षांमध्ये तीन वेळा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे वरिष्ठ सल्लागार आणि आघाडीचे संशोधक असणाऱ्या डॉ. तपन मिश्रा यांनी केला आहे. तपन यांनी सोशल मीडियावर ५ जानेवारी रोजी एक पोस्ट केली असून त्यांनी त्यामध्ये धक्कादायक आरोप केलेत. इस्रोच्या संशोधकांनी प्रगती करावी आणि कमी खर्चामध्ये टीकणारी उपकरणे, तंत्रज्ञान निर्माण करावे असे बाहेरच्या लोकांना वाटत नसल्याचा आरोपही तपन यांनी केला आहे. अशाप्रकारचा हल्ला हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेला गुप्त हल्ला असल्याचा दावा तपन यांनी केला आहे. डॉ. विक्रम साराभाई यांच्या रहस्यम पद्धतीने झालेल्या मृत्यूचा दाखला देत केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी तपन यांनी केली आहे.

सध्या इस्रोमध्ये तपन हे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ३१ जानेवारी रोजी ते निवृत्त होणार आहेत. त्यांनी निवृत्तीच्या काही आठवडे आधीच सोशल मीडियावर लाँग केप्ट सीक्रेट म्हणजेच दिर्घकाळापासूनचे गुपित या मथळ्याखाली एक पोस्ट शेअर केली. देशांतर्गत सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांनी जुलै २०१७ साली आपली भेट घेऊन आर्सेनिकच्या माध्यमातून विषप्रयोगाची भीती व्यक्त करत सावध राहण्याचा दिल्याचे या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

हे रहस्य बऱ्याच दिवसांपासून लपून राहिले होते. पण आता ते सार्वजनिक करावे लागत आहे. २३ मे २०१७ रोजी पहिल्यांदा बंगळुरुमधील मुख्यालयाच्या प्रमोशनसंदर्भातील मुलाखतीमध्ये आर्सेनिक ट्रायऑक्साइड देण्यात आले. दुपारच्या जेवणाच्या वेळी हे डोश्यासोबतच्या चटणीमध्ये मिसळण्यात आले होते. कारण मग ते जास्त काळ माझ्या पोटात राहून शरीरात पसरुन रक्ताच्या गुठळ्या निर्माण व्हाव्यात आणि हृयविकाराच्या झटक्याने मृत्यू व्हावा असा उद्देश होता. पण ते जेवण मला फारसे आवडले नाही. त्या डोश्यासोबत मी थोडी चटणी खाल्ली होती. त्यामुळेच याचा जास्त परिणाम नाही झाला. पण यामुळे दोन वर्ष रक्तस्त्राव होण्याचा बराच त्रास मला झाल्याचे या पोस्टमध्ये तपन यांनी म्हटले आहे.

चंद्रयान-२ ची मोहीम लॉन्च करण्याच्या दोन दिवस आधी दुसरा हल्ला झाला. हायड्रोजन साइनाइडच्या मदतीने १२ जुलै २०१९ रोजी मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण वेळीच एनएसजी अधिकाऱ्याने दखल घेतल्याने जीव वाचला. उच्च सुरक्षा यंत्रणा असणाऱ्या माझ्या घरात सुरुंग खोदून विषारी साप सोडण्यात आले. सप्टेंबर २०२० मध्ये तिसऱ्यांदा आर्सेनिक देऊन मला मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मला श्वसनासंदर्भातील गंभीर आजार, त्वचेसंदर्भातील आजार, न्यूरोलॉजिकल तसेच फंगल इन्फेक्शनसंदर्भातील समस्या जाणवू लागल्याचा दावा तपन यांनी पोस्टमध्ये केला आहे.

घरात दोन वर्षांपासून कोब्रा, करैतसारखे विषारी साप आढळून आले आहेत. घरात या सापांपासून संरक्षण करण्यासाठी दर १० फुटांवर कार्बोलिक अ‍ॅसिडच्या सुरक्षा जाळ्या लावल्यानंतरही घरात साप आढळून येत आहेत. घरामध्ये एकदा एल आकाराचा खड्डा सापडला. साप याच खड्ड्यामधून सोडण्यात येत होते. माझा लवकरात लवकर मृत्यू व्हावा अशी काहींची इच्छा आहे, ज्यामुळे ही रहस्य माझ्यासोबत कायमची नष्ट होतील. मला आणि माझ्या कुटुंबाला देशाने वाचवावे, असेही तपन यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.