मिस ग्रेटब्रिटन झारा करोना नियमावली मोडल्याने अटकेत

फोटो साभार डेली मेल

ब्रिटन मध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेने हैदोस मांडला आहे आणि परिणामी देश पुन्हा एकदा लॉक डाऊनला सामोरा जात आहे. करोना नियमावलीचे काटेखोर पालन केले गेले पाहिजे यासाठी जगभर जागृती अभियाने राबविली जात असताना काही लोक नियम तोडत आहेत. माजी मिस ग्रेट ब्रिटन झरा हॉलंड यापैकीच एक असून तिला विमानतळावर अटक केली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार झारा गेल्या आठवड्यात तिच्या बॉयफ्रेंड सोबत बार्बाडोस येथे गेली होती. त्यांना हॉटेल मध्ये क्वारंटाइन केले गेले होते आणि तिथे त्या दोघांची करोना टेस्ट केली गेली. त्यात हे दोघेही पोझिटिव्ह आल्याने झारा घाबरली आणि तिने बॉयफ्रेंड सह पलायन करण्याचा प्रयत्न केला पण विमानतळावर तिला पकडून अटक करण्यात आली. तिला न्यायालयासमोर हजर करून १८ हजार पौंड दंड ठोठावला गेला आहे. आता या दोघांना आयसोलेशन मध्ये ठेवले गेले असून करोना मधून पूर्ण बरे झाल्यावर तिला कदाचित तुरुंगवास भोगावा लागेल असे समजते.

बार्बाडोस मध्ये करोनाचा उद्रेक होऊ लागल्यावर अतिशय कडक नियमावली जारी केली गेली आणि या देशाने करोना संक्रमण रोखण्यात मोठे यश मिळविले आहे. नियमावली मोडणारयाला येथे कडक शासन केले जाते. येथे आत्तापर्यंत फक्त ३८३ करोना केस आढळल्या असून ७ जण मृत्यू पावले आहेत.