नवी दिल्ली – नुकतीच कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने अव्वलस्थानी झेप घेतली. अव्वलस्थानासाठी स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात सुरु असलेली स्पर्धा संपुष्टात आणून पहिल्या क्रमांकावर तो विराजमान झाला आहे. त्याचबरोबर त्याने पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या कसोटीत दमदार द्विशतक ठोकत आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे केला. केन विल्यमसनने मंगळवारी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात हेन्री निकल्स याच्यासोबत ३६९ धावांची भक्कम भागीदारी केली. याचसोबत विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील ७ हजार धावांचा टप्पा गाठला.
पाकिस्तान विरोधात विल्यमसनचे विक्रमी द्विशतक
कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात कमी डावांमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज केन विल्यमसन हा ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये केन विल्यमसनने सलग तीन शतके ठोकत ७ हजार धावांचा टप्पा गाठला. विल्यमसन असा पराक्रम करणारा न्यूझीलंडचा केवळ तिसरा फलंदाज ठरला. याआधी स्टीफन फ्लेमिंग (७१७२) आणि रॉस टेलर (७३७९*) या दोघांनी सात हजार धावांचा टप्पा गाठला होता. पण विल्यमसनने सर्वात कमी डावांत हा पराक्रम केला.
🇳🇿 Kane Williamson becomes just the third player to score 7️⃣0️⃣0️⃣0️⃣ Test runs for New Zealand 🎉#NZvPAK pic.twitter.com/YtfrCc9VHw
— ICC (@ICC) January 4, 2021
८३ कसोटी सामन्यात विल्यमसनने ७ हजार धावांचा टप्पा गाठला. ५३.८५ च्या सरासरीने धावा काढत त्याने हा पराक्रम आपल्या नावे केला. त्याने त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत २४ शतके आणि ३२ अर्धशतके ठोकली आहेत. २५१ धावा ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्याला हा विक्रम मोडण्याची संधी होती. पण तो २३८ धावांवर या डावात बाद झाला. त्याने ही खेळी ३६२ चेंडूत २८ चौकारांसह केली. निकल्ससोबत त्याने ३६९ धावांची भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. हेन्री निकल्स (१५७) आणि डेरल मिचेल (१०२*) यांच्या दमदार शतकाच्या साथीने न्यूझीलंडच्या संघाने ६ बाद ६५९ धावांपर्यंत मजल मारली.