फायझरची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा ४८ तासांमध्ये मृत्यू


पोर्तो – फायझरची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर पोर्तुगीजमधील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा ४८ तासांमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया असेवेडो असे मृत्यू झालेल्या ४१ वर्षीय महिला आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव होते. सोनिया यांच्यात लस घेतल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नव्हते. पण त्यानंतर दोन दिवसांमध्येच सोनिया यांचा मृत्यू झाला. सोनिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी सध्या मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. अमेरिकन कंपनी असणाऱ्या फायझरची लस दिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स ब्रिटननंतर फिनलॅण्ड आणि बुल्गेरियामध्येही दिसून आले आहेत.

यासंर्दभातील वृत्त डेली मेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार पोर्तो शहरामधील पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये सोनिया कार्यरत होत्या. समोर आलेल्या माहितीनुसार यापूर्वी कोणताही आजार त्यांना झालेला नव्हता किंवा त्यांना कोणत्याही आजाराचे साईड इफेक्ट्सही झाल्याचे त्यांच्या आरोग्यासंदर्भातील जुन्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आलेले नव्हते. सोनिया यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. पोर्तुगीजमधील वृत्तपत्राला सोनिया यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी दिलेल्या माहितीमध्ये माझी मुलगी अगदी ठणठणीत असल्याचे म्हटले आहे.

कोणतीही व्याधी किंवा आजार सोनियाला नव्हता अशी माहितीही तिच्या वडिलांनी दिली आहे. कोरोनाची कोणताही लक्षणे सोनियामध्ये दिसत नव्हती. तिच्या मृत्यूच्या एक-दीड दिवस आधीच तिला लसीकरणातील स्वयंसेवक म्हणून कोरोनाची लस देण्यात आली होती. तिला अचानक काय झाले, मला ठाऊक नाही. पण तिचा मृत्यू कसा झाला याचे उत्तर मला संबंधित संस्थांकडून हवे असल्याची मागणी सोनियाच्या वडिलांनी केली आहे. सोनियाच्या मागे तिची दोन मुले आणि पती असा परिवार आहे.

सोनियाला ३० डिसेंबर रोजी लस देण्यात आली होती आणि तिचा एक जानेवारी रोजी मृत्यू झाला, असे पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीने जारी केलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे. लसीचे कोणतेही साईड इफेक्ट सोनियामध्ये दिसून आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नक्की कशामुळे सोनियाचा मृत्यू झाला याचा तपास केला जात आहे. तिच्या आधीच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये तिला कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट होत असल्याचेही पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीच्या या पत्रकात म्हटले आहे. तर दुसरीकडे फिनलॅण्डनंतर आता बुल्गेरियामध्येही अमेरिकेच्या फायझर कंपनीच्या लसीचे साईड इफेक्ट दिसून येत आहेत. दोन रुग्णांना अंगदुखी आणि ताप येत आहे.

यापूर्वी फिनलॅण्डमधील पाच रुग्णांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे साईड इफेक्ट दिसून आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरामध्ये आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लसीला परवानगी दिली आहे. ब्रिटनमध्येही दोन आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही ही लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आल्यानंतर जगभरामध्ये फायझरचा वापर केल्या जाणाऱ्या देशांमध्ये या लसीच्या वापरासंदर्भातील दक्षता घेण्यासंदर्भाती सूचना जारी करण्यात आल्या आहेत.