ब्रिटनमधील पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये


लंडन – ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याची घोषणा पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जवळपास पाच कोटी जनता लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा लॉकडाउन फेब्रुवारीच्या मध्यात लागू होण्याची शक्यता आहे. हा लॉकडाउन कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी लागू केला जात असल्याचे त्यांनी सांगितले असून शाळांपासून याची सुरुवात होणार आहे. सर्व शाळा बंद बुधवारपासून होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर केल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे.

मृत्यूदर जास्त असल्या कारणाने ब्रिटनमध्ये आधीच जवळपास चार कोटी जनतेला कडक निर्बंधांमध्ये रहावे लागत आहे. कोरोनाला आळा घालण्यात ब्रिटन अपयशी ठरले असून कोरोनाबाधितींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी कोरोनाच्या नव्या प्रकाराला जबाबदार ठरवण्यात आले आहे. सोमवारी बेरिस जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले जवळपास २७ हजार लोक रुग्णालयात दाखल असून एप्रिलच्या पहिल्या महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती त्याच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्के जास्त आहे. गेल्या मंगळवारी फक्त २४ तासांत ८० हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

अद्यापही देशातील अनेक ठिकाणी कडक निर्बंध असताना कोरोनाचा नवा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे अजून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन केला पाहिजे, असे बेरिस जॉन्सन यांनी सांगितले. पहिल्या तीन महिन्यांच्या लॉकडाउनदरम्यान जे निर्बंध होते तेच यावेळी असतील असे बेरिस जॉन्सन यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्रिटनमध्ये सर्वात प्रथम मार्च ते जून असे तीन महिने लॉकडाउन होता. दुसरीकडे महत्वाच्या कामांसाठी लोक घराबाहेर पडू शकतात, असेही त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सामान खरेदी, वर्क फ्रॉम होम शक्य नसेल तर ऑफिसला जाण्यासाठी, व्यायाम, वैद्यकीय मदत, घरगुती हिंसाचारापासून वाचण्यासाठी यांचा उल्लेख त्यांनी केला.