दुखापतग्रस्त के. एल. राहुल उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर


सिडनी – ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाली आहे. के एल राहुलला मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतून वगळण्यात आले आहे.

के एल राहुलच्या दुखापतीसंबंधीची माहिती बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत दिली आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर शनिवारी सराव करत असताना के एल राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. तीन आठवड्यांचा वेळ यष्टीरक्षक आणि फलंदाज के एल राहुलला दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी लागणार असल्याने राहुल बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

लवकरच के एल राहुल भारतात परतणार असून तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपस्थित राहणार असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. भारतीय संघातील के एल राहुलची अनुपस्थिती भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. राहुलच्या आधी दुखापतीमुळे मोहम्मद शमी आणि उमेश यादव संघाबाहेर आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाचा इशांत शर्मालादेखील भाग होऊ शकला नाही.

सिडनीमध्ये ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये एकीकडे रोहित शर्माची उपस्थित भारतीय संघासाठी मोठी जमेची बाजू असताना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाला के एल राहुलची दुखापत मोठा धक्का असू शकतो. तीन डावांमध्ये हनुमा विहारीने फक्त ४५ धावा केल्या असल्यामुळे के एल राहुल पुनरागमन करत भारतीय संघाची फलंदाजी मजबूत करेल अशी आशा होती.