दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मोफत मिळावी कोरोना लस : राजेश टोपे


मुंबई: दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोरोना लसीसाठी ५०० रुपये खर्च करणे अवघड असून त्यांना ही लस मोफत मिळावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या बाबतीत केंद्राने वेळीच निर्णय घेतला नाही तर राज्य सरकार त्यासंबंधी निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

राज्यभरात दि. ८ रोजी ड्राय रान केला जाणार आहे. त्यापूर्वी एक दिवस केंद्रीय आरोग्यमंत्र्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहे. यावेळी मोफत लसींसह अनेक मुद्दे चर्चेत येणार आहेत, असे सांगून टोपे म्हणाले की, ड्राय रनच्या काळात लसीकरणाच्या दृष्टीने शासकीय यंत्रणा कितपत सज्ज आहे, याची पाहणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस यांच्यामध्ये समन्वय आहे की नाही, याची खात्री करून घेतली जाणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे २५० रुपये असणार आहे. एका व्यक्तीला दोन डोस घेणे गरजेचे आहे. गॅरी जनतेला हा खर्च करणे नाही. त्यांच्यावर या खर्चाचा बोजा टाकणे अयोग्य ठरेल. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना ही लस मोफत दिली जावी,अशी मागणी टोपे यांनी केली आहे.