चीनच्या सरकारी वृत्तपत्राने उघड केला जॅक मा यांचा ठावठिकाणा


पेइचिंग : मागील काही महिन्यांपासून चीनमधील अब्जाधीश, अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांना सार्वजनिक ठिकाणी पाहिले न गेल्यामुळे ते बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता जॅक मा यांचा ठावठिकाणा चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत उघड केला आहे.

जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत जागतिक पातळीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ने या पार्श्वभूमीवर जॅक मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या वृत्तपत्रानुसार, एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली जॅक मा यांना ठेवण्यात आले आहे. तसेच जॅक मा यांना चिनी सरकारकडून देश सोडून न जाण्याची ताकीद देण्यात आल्याची माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.

चीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर जॅक मा यांनी टीका केल्यामुळे त्यांच्यावर सरकारची खप्पा मर्जी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्या ठावठिकाणाबाबत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘युके टेलिग्राफ’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, जॅक मा यांच्याच कंपनीने गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या ‘आफ्रिकाज बिझनेस हीरोज’ या टॅलेंट शोच्या अंतिम भागात परीक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. तथापि, कार्यक्रमाला ते आलेच नाहीत. त्यांच्या जागी कंपनीचा एक कार्यकारी अधिकारी उपस्थित राहिला.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये चीनच्या वित्तीय नियामकावर जॅक मा यांनी टीका केली होती. नियामकाच्या नियमांना ‘म्हाताऱ्यांचा क्लब’ आणि चिनी बँकांना ‘सावकारी दुकाने’ जॅक मा यांनी म्हटले होते. या टीकेमुळे चिडलेल्या चीनी सरकारने जॅक मा यांच्या अँट समूहाचा एक आयपीओ रोखला. अलिबाबाविरुद्ध डिसेंबर २०२० मध्ये एकाधिकारशाहीविरोधी चौकशी सुरू करण्यात आली.