भारताच्या कोरोनाविरोधी प्रयत्नांची मान्यवरांकडून प्रशंसा


नवी दिल्ली: कोरोनाविरोधात भारताने उचलली पावले, विशेषतः लस विकसित करण्यासाठीचा पुढाकार याबद्दल मान्यवरांकडून प्रशंसा केली जात आहे. त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस घेब्रायसस आणि बिल गेटस यांचा समावेश आहे.

कोरोनावरील लसीच्या उत्पादनात आघाडी घेऊन भारताने कोरोनाविरोधी लढ्यासाठी आपण सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून त्याने आपली जबाबदारी पार पडली आहे, असे आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ट्विट करून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘आपण जर एकत्रितपणे कार्य केले तर विषाणूने सर्वाधिक बाधित असलेल्या जगातील कोणत्याही व्यक्तीपर्यंत कोरोनाची लस पोहोचवू शकू.’

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेटस यांनीही भारताचे कौतुक केले आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची तयारी करीत असताना भारताने लस विकसित करण्यात आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ती उपलब्ध करून देण्यात भारताने घेतलेला पुढाकार आणि आघाडी ही आनंद देणारी बाब आहे,असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.