कोव्हिशिल्ड लसीची किंमत अदर पुनावाला यांनी केली जाहीर


पुणे – सीरम संस्थेने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिल्यामुळे आता देशभरातील सर्वांच्या नजरा लसीकरण मोहीम कधी सुरु होणार याकडे लागल्या आहेत. दरम्यान सर्वसामान्यांमध्ये कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचीही चर्चा सुरु आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी खुलासा केला आहे.

लसीची रिटेलमध्ये विक्री करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, तर १००० रुपयांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध असेल. तर दुसरीकडे आपण हीच लस सरकारला २०० रुपयांमध्ये देत असल्याचेही, त्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारला १० कोटी कोरोना लसीचे डोस सीरम देणार आहे. प्रत्येक डोससाठी केंद्र सरकारला २०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर टेंडर काढले जातील आणि किंमतीतही बदल होतील, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.

पण यादरम्यान मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, आम्ही सरकारला जे काही देणार आहोत ते लोकांना मोफत दिले जाणार आहे. तर आम्ही खासगी मार्केटमध्ये जेव्हा याची विक्री करु तेव्हा प्रत्येक डोसची किंमत १००० रुपये एवढी असेल, असं अदर पुनावाला यांनी सांगितले. लसला बूस्टर डोसची आवश्यकता असल्याने याची एकूण किंमत २००० असेल.

आता पाच कोटी कोरोना लसीचे डोस सीरमकडे उपलब्ध आहेत. अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व औपचारिकता पुढील सात ते दहा दिवसांत पूर्ण होतील आणि आम्ही एका महिन्यात सात ते आठ कोटी लसींची पुरवठा करण्यासाठी निर्मिती करु. त्याचबरोबर त्यांनी पुढे सांगितले की, कोरोना लसीची आम्ही निर्यात किंवा खासगी मार्केटमध्ये विक्री करु शकत नाही. आम्हाला तसे केंद्र सरकारने सांगितले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वाटचाल करावी लागणार आहे. अनेक महत्वाच्या लोकांना लस देणे त्यांचे प्राधान्य असून आम्हीदेखील त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.